नांदेडमध्ये गोरक्षकांच्या गटावर प्राणघातक हल्ला, एक ठार तर ६ जखमी

नांदेड २० जून २०२३: महाराष्ट्रातील नांदेडमध्ये, गोरक्षकांच्या एका गटाला रस्त्यावर गाडी अडवणे अंगलट आले. गाडीत बसलेल्या लोकांनी गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले. या संपूर्ण घटनेबाबत इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना तेलंगणा सीमेजवळ घडली असुन एसपींनी सांगितले की, गोरक्षकांवर हा हल्ला काल रात्री अकराच्या सुमारास झाला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या घटनेतील आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस म्हणाले की, आरोपी कुठेही पळून गेले तरी त्यांना कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल.

तेलंगणा सीमेजवळ एक संशयास्पद कार रस्त्याने जात होती, त्यानंतर गोरक्षकांच्या एका गटाने ही गाडी थांबवली, यावरून गाडीतील लोकांचा गोरक्षकांशी वाद झाला. आधी वादावादी झाली, त्यानंतर हाणामारी सुरू झाली. कारमधील १० ते १२ जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप गोरक्षकांनी केला. यावेळी काही गोरक्षक गंभीर जखमी झाले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या सहा गोरक्षकांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पीडितांच्या म्हणण्यानुसार कार तेलंगणाची होती. पोलिसांनी सांगितले की, कारच्या मार्गावरील आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत. आरोपी कोण होते आणि ते कुठे जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या गोरक्षकांकडूनही माहिती गोळा करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा