गोपेश्वर (उत्तराखंड), ७ जानेवारी २०२३ : चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ शहरात कुठे रस्त्यांवर भेगा पडल्यात.. तर कुठे घरांच्या भिंतींना तडे गेलेत… कुठे घरं पडतायेत… तर कुठे भिंतींमधून पाण्याचा प्रवाह सुरू झालाय… हे कुठल्या चित्रपटातील दृश्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील स्थिती आहे. भूस्खलन होऊ लागल्याने पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. येथील अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी रात्री दिले.
याविषयी माहिती अशी, की उत्तराखंडमधील बद्रीनाथधामपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ शहरातील भिंतींना आणि रस्त्यांना मोठमोठे तडे केले आहेत. घरांच्या भिंतींना तडे जाऊन पाणी वाहत आहे. अनेक भागांत भूस्खलन आणि कोसळलेल्या भिंतींमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. ज्यांची घरे, जमिनीला तडे गेले आहेत. ते घर सोडून बाहेर गेले आहेत. दरम्यान, शहरातील नागरिकांना घर सोडण्याचे आदेश दिले असून, बाधित कुटुंबाला सहा महिन्यांचे भाडे देण्यात येणार आहे. ज्या लोकांची घरे धोक्यात आहेत किंवा राहण्यायोग्य नाहीत, त्यांना पुढील सहा महिने भाड्याच्या घरात राहण्यासाठी मदत म्हणून प्रतिकुटुंब ४ हजार रुपये दिले जातील. मुख्यमंत्री साहाय्य निधीतून ही मदत दिली जाईल, अशी घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे.
याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षित ठिकाणी तत्काळ मोठे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत; तसेच क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे आणि धोक्याचे क्षेत्र त्वरित रिकामे करून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.
घरे, डोंगराचा भाग खचतोय
जोशीमठ शहरातील घरे, डोंगराचा भाग खचू लागला आहे, तर जमिनींनादेखील मोठ्या भेगा पडल्या आहेत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या विकासकामांचा हा परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कायकर्ते, पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे.
आध्यात्मिक स्थळांनाही फटका
नागरिकांच्या घरासोबतच जोशीमठ शहरातील आध्यात्मिक, पौराणिक वास्तूंना फटका बसला आहे. आदिगुरू शंकराचार्यांच्या पौराणिक मंदिरालाही तडे गेले आहेत. ज्योतिर्मठ शिवालय हे अमर कल्पवृक्ष असल्याची श्रद्धा आहे. ज्योतिर्मठ हेच जोशीमठाचे अस्तित्व मानले जाते. हे मंदिर सुमारे अडीच हजार वर्षे जुने आहे. २५०० वर्षे जुना कल्पवृक्षही धोक्यात आला आहे. याच ठिकाणी जगद्गुरू शंकराचार्य यांना दिव्य ज्ञान मिळाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जीव मुठीत घेऊन वावर
जोशीमठ शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शहरातील नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. अनेकजण थंडीच्या दिवसांत उघड्या मैदानावर रात्र काढत आहेत. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते जोशीमठमध्ये जवळपास ९० टक्के घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर ४० टक्के घरे धोकादायक बनली आहेत.
दरम्यान, सरकारकडून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जात असल्याचा दावा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केला. या घटनेचे नेमकं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ, शास्त्रज्ञांचे पथक जोशीमठमध्ये दाखल झाले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील