गोल पोस्ट राष्ट्रीय बलात्कारी बाबा नित्यानंदाने बनवला नवा देश ?

बलात्कारी बाबा नित्यानंदाने बनवला नवा देश ?

बलात्काराचा आरोपी असणारे नित्यानंद महाराज त्यांच्या एका व्हिडीओमुळे गेल्या वर्षापासून चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना बलात्काराच्या खटल्या प्रकरणी कोर्टात हजर राहायचा आदेश आल्यानंतर त्यांनी देश सोडला असल्याची बातमी आली.
ते कुठे पळून गेले की आणखी कुठे गेले? याचा कोणालाच पत्ता लागला नव्हता. असे देश सोडून पळालेले महाभाग परदेशात जाऊन कुठेतरी लपतात हे तर तुम्हाला माहित आहेच.
परंतु या महाराजांनी आणखी मोठे पाऊल टाकल्याची माहिती मिळाली आहे. या महाराजांनी तर स्वतःचा देशच तयार केल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी नित्यानंद त्रिनिदाद आणि टोबॅगो जवळ असणाऱ्या एका बेटाजवळून लाइव्ह प्रवचन दिले.
याबाबत नित्यानंदांच्या आश्रमाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे बेट स्वतः नित्यानंद यांनी विकत घेतलेले असून तो आता नवीन देश आहे. “कैलासा” असे या देशाचे नाव आहे. या देशाचं स्वतःचा झेंडा, पासपोर्ट आणि चिन्ह आहे. हा एक हिंदू देश आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

या वेबसाइडवरून अशी माहिती मिळते आहे की, हा नवीन देश एप्रिल २०१९ पासून अस्तित्वात आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना स्वतःच्याच देशात अस्सल हिंदू धर्म पळता आला नाही अशा जगभरातल्या हिंदू धर्मियांनी मिळून या देशाची स्थापना केली आहे.

या बेटाचा नेमका पत्ता कोणालाच माहिती नाही. एका माहितीनुसार हे बेट इक्वेडोरच्या नजीक आहे. दुसऱ्या एका बातमीनुसार हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो जवळ आहे. खरा पत्ता सापडला तर पोलीस तिथे पोहोचतील म्हणून कदाचित पत्ता सांगण्यात आला नसावा.

तिथे कसे पोहोचायचे हे जरी माहित नसले तरी ‘कैलासा’मध्ये काय काय असेल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या नवीन देशात गुरुकुल पद्धतीचे शिक्षण असेल. तिसऱ्या नेत्रामागचं विज्ञान, योग, ध्यानधारणा शिकवली जाईल. याखेरीज मोफत आरोग्य सेवा, मोफत शिक्षण, मोफत  अन्न आणि मंदिरावर आधारित जीवनशैली असणार आहे.

मंडळी, आता या थोतांडातून बाहेर येऊन परिस्थिती पाहूया. देश तयार करणे म्हणजे जमीन विकत घेण्याइतकं सोप्पं काम नाही. इतर देशांनी त्या देशाला मान्यता द्यावी लागते. कोणीही उठून देश तयार करू शकत नाही. हे खुद्द आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

ज्या वेबसाईटवरून ही माहिती प्रसारित करण्यात आली ती अमेरिकेच्या टेक्सस येथील डॅलस शहरातून चालवली जात असल्याचे समजले आहे. तपास यंत्रणा या वेबसाईटवर नजर ठेवून आहे.परंतु ही बातमी बोगस आहे की खरी आहे हे लवकरच समजणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version