Rain affecting vegetable supply: मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारामध्ये सध्या भाज्यांच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. पाऊस लांबल्यामुळे पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे मटार आणि वांग्यासारख्या फळभाज्यांनी मात्र ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चाट दिली आहे.
रविवारी (दि. १३) उपबाजारामध्ये फळभाज्यांची ४ हजार २९९ क्विंटल आवक झाली, तर पालेभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा जास्त होऊन ५३ हजार ९५० गड्यांवर पोहोचली आहे. यामुळे कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांचे दर प्रतिकिलो ७ ते २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, जे ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.
याउलट, मटारचे दर प्रतिकिलो १५० रुपयांवर पोहोचले आहेत, तर वांगी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. भेंडी (५०-६० रुपये), घेवडा (८०-९० रुपये), पावटा (८० रुपये), वाल (१०० रुपये) अशा अनेक फळभाज्यांचे दर चढेच आहेत. गवारचे दर थोडे कमी होऊन ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. लसणाची आवक झालेली नाही, तर पेरूची आवक कमी झाल्याने त्याचे दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
फळांमध्ये पपईची सर्वाधिक ११० क्विंटल आवक झाली असून, ती २० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. सफरचंद (२१० रुपये), डाळिंब (१२० रुपये) आणि केळी (४५-७० रुपये) यांचे दर अजूनही चढेच आहेत.
पाऊस लवकर न आल्यास भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडू शकते. त्यामुळे, आता शेतकऱ्यांसोोबतच सर्वसामान्यांनाही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































