नवी दिल्ली, २९ जुलै २०२३ : भारतीय जनता पक्षाने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सह संघटन महामंत्री, राष्ट्रीय सचिव आणि कोषाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ८ राष्ट्रीय महामंत्री आहेत. भाजपने १३ पैकी दोन मुस्लिम नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवले आहे. अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीचे माजी व्हाइस चांसलर तारिक मंसूर यांना भाजपा उपाध्यक्ष बनवले आहे. केरळचे अब्दुल्ला कुट्टी आधीपासूनच भाजपा उपाध्यक्ष आहेत.
भाजपाने बी एल संतोष यांना राष्ट्रीय महामंत्री (संघटना) बनवले आहे. या लिस्टमध्ये पक्षाच्या १३ राष्ट्रीय सचिवांची नावे आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना केंद्रीय संघटनेत जबाबदारी मिळाली आहे. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे सौदान सिंह यांना राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान मिळाले आहे. उत्तर प्रदेशातून येणारे तारिक मंसूर यांच्याशिवाय खासदार लक्ष्मीकांत बाजपाई आणि रेखा वर्मा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांना भाजपाचे नवीन राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये भाजपाने १३ राष्ट्रीय सचिवांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नावे आहेत. आंध्र प्रदेशातून सत्या कुमार, दिल्लीतून अरविंद मेनन, पंजाबमधून नरेंद्र सिंह रैना, राजस्थान मधून अल्का गुर्जर, पश्चिम बंगालमधून अनुपम हाजरा, मध्य प्रदेशातून ओमप्रकाश धुर्वे, बिहारमधून ऋतुराज सिन्हा, झारखंडमधून कामख्या प्रसाद तासा, उत्तर प्रदेशातून सुरेंद्र सिंह नागर आणि केरळमधून अनिल एंटनी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकिला काही महिने शिल्लक राहिले आहेत. देशातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप कडून मिशन २०२४ च्या लोकसभेची तयारी सुरू केल्याचे सूतोवाच मिळत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर