सप्तशृंग गडावरील भवानी पाझर तलाव भरला, गावकऱ्यांकडून तलावाचे जलपूजन

नाशिक, १ ऑगस्ट २०२३ : गेल्या पंधरा दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे.अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. सलग पडलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. आता सप्तशृंग गडावरील भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सप्तशृंग गडावर राज्यासह इतर राज्यातून भाविक येत असतात. गडावरील भवानी पाझर तलाव भरल्यामुळे येथे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून सप्तशृंग गडावर मुसळधार पाऊस सुरू आहे.या पावसामुळे गडावर पाणी पुरवठा करणारा भवानी पाझर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. भवानी तलाव भरल्याने ग्रामस्थांना आणि मंदिर समितीला मोठा दिलासा मिळाला आहे. मे आणि जून महिन्यांत तलावात मृत साठा शिल्लक असल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचा पुरवठा या तलावातून केला जातो. तसेच गावकऱ्यांसाठी देखील हा महत्त्वाचा पाण्याचा स्रोत आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने ग्रामस्थांना देखील मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तलाव भरल्यावर सरपंच रमेश पवार यांच्या हस्ते भवानी तलावाचे जलपूजन करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा