पुणे, ३ जुलै २०२३: धार्मिक प्रचाराच्या नावाखाली देश विघातक कृत्य करुन सामान्य माणसांची दिशाभूल करणाऱ्या पुण्यातील एका तरुणास आज सकाळी कोंढवा परिसरातील नुरानी मस्जिंद जवळून एनआयएने ताब्यात घेतले. हा तरुण इसिस या संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणेला असून अनेक दिवसांपासून त्यांच्या हालचालींवर लक्ष होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी एकत्रपणे आज राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले आहे.
याचाच एक भाग म्हणून पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या नुरानी मस्जिंद जवळ एक तरुण धार्मिक प्रचाराच्या नावाखाली दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे तपास यंत्रणांना कळाले. आधीपासूनच तपास यंत्रणेच्या रडारवर असलेला जुबेर नामक तरुण अखेर आज अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. काही दिवसांपूर्वी मुंबईतील नागपाडा येथील तरुणास दहशतवादी कारवायाच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या संयुक्त कारवाईत कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये एनआयए-आयबी यांच्या पथकाने सकाळीच छापे मारले. तपास यंत्रणेला जो तरुण हवा होता तो त्याठिकाणी मिळून आला नाही. जुबेर नामक तरुणांच्या शोधासाठी पथकातील काही अधिकाऱ्यांनी तो जात असलेल्या मस्जिद जवळ त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा तरूण काही लोकांना धार्मिक प्रचाराच्या नावाखाली भलतेच काही सांगत असल्याचे कळाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर