डोमकावळा हा साध्या कावळ्या पेक्षा आकाराने मोठा व पूर्ण चकचकीत काळ्या रंगाचा असतो. त्याचा आढळ संपूर्ण भारतीय उपखंडात असून तो भारत, श्रीलंका, नेपाळ व बांग्लादेश या ठिकाणी आढळतो. हिमालयात तो समुद्रसपाटीपासून ३,९६५ किलोमीटर उंचीपर्यंत सापडतो. ऋतुमानानुसार तो आपले स्थान बदलतो. उन्हाळ्यात तो उंचावर जातो तर हिवाळ्यात खाली उतरतो. याचा आढळ जंगलांत असला तरी थोड्याफार प्रमाणात तो खेड्यापाड्यांत, गावांत व शहरांतही दिसून येतो. याचा आढळ मनुष्यवस्तीपासून दूर असतो. याला जंगली कावळा Jungle Crow असेही म्हणतात. डोमकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो.
डोमकावळ्याच्या लांब/जाड चोचीचा कावळा (Large billed crow), पूर्वीय जंगली कावळा (Eastern jungle crow) व भारतीय जंगली कावळा (Indian jungle crow) अशा तीन उपप्रजाती आहेत. लांब चोचीच्या कावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस (Corvus macrorhynchos), पूर्वीय जंगली कावळ्याचे को. लेव्हिलॅन्टी (Corvus levaillantii) व भारतीय जंगली कावळ्याचे को. कुलमिनॅटस (Corvus culminatus) असे आहे. विशेषेकरून लांब चोचीचा कावळा ही उपप्रजाती डोमकावळा म्हणून ओळखली जाते.
डोमकावळा नर-मादी दिसायला सारखेच असतात. याची लांबी दोन फुटापर्यंत असून पंखविस्तार साडेतीन फूट व वजन सहा, सातशे ग्रॅम असते. डोमकावळ्याचा रंग चकचकीत काळा व त्यामध्ये जांभळ्या रंगाची किनार असते. डोळे तपकिरी रंगाचे, चोच लांब, जाड व मजबूत असते. पाय काळे असतात. त्याचा काव कावऽऽ आवाज मोठा व कर्कश्श असून असा आहे. डोमकावळा सर्वभक्षी असून त्याच्या आहारात कुजके मांस, मासे, फळे, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी व पिले यांचा समावेश असतो. तो कुजलेल्या वनस्पती व मृत प्राणीही खातो, त्यामुळे परिसर स्वच्छ राखण्यास मदत होती.
डोमकावळ्याचे जंगलात थवे किंवा समूह आढळून येतात. शहरात किंवा मनुष्य वस्तीत तो जोडी जोडीने आढळतो. विणीचा हंगाम प्रदेशानुसार निरनिराळा असतो. याचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात मार्च-एप्रिल तर दक्षिणेत डिसेंबर-मार्च असा असतो, तर श्रीलंकेत तो मे-जूनमध्ये असतो. याचे घरटे घरकावळ्याच्या घरट्यासारखेच असून ते काटक्यांपासून बनवलेले असते. नर-मादी दोघे मिळून उंच झाडावर घरटे बांधतात. मादी ४-५ निळसर हिरव्या रंगाची अंडी घालते. अंडी उबवणे तसेच पिलांना भरविण्याचे काम नर-मादी दोघे मिळून करतात. पिलू एक महिन्याचे झाले की उडू लागते. डोमकावळ्याच आयुर्मान १५,१६ वर्षांच असते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.