नाग आणि नागपंचमी

पुणे, २१ ऑगस्ट २०२३ : सापांपैकी सर्वात जास्त जाच सहन करणारा साप म्हणजे “भारतीय नाग” इंग्रजीत याला Indian Spectacle Cobra म्हणतात आणि वैज्ञानिक भाषेत या सापाला नाजा नाजा म्हंटले जाते. जगभरात हा साप वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. पण या सापाच वैशिष्ट्य म्हणजे हा फणा काढून उभा राहतो. त्यामुळे हा साप ओळखणे सर्वात सोपे जाते. भारतातील सर्वात विषारी सापांपैकी बहुतांश लोकांना परिचित असलेला साप म्हणजे नाग.

तुम्ही बकरीला मटण चारू शकता का? गायी म्हशीला चिकन खायला देऊ शकता का? तर याचे उत्तर निश्चितच नाही हे असेल. हरीण, शेळ्या-मेंढ्या, गाय -बैल हे प्राणी निसर्गतः पूर्णपणे शाकाहारी आहेत, याची माहिती माणसाला असल्याने जगात कुठेही या प्राण्यांना मांस खायला दिले जात नाही. मग नागाला दूध पाजण्याची एवढी घाई का बर लोकांना असते? साप हा सस्तन प्राणी नाही, तो सरपटणारा प्राणीआहे हे शाळेतच शिकवले जाते. नाग जर दूध पीत असता तर नागाला स्तन असते. जगात कुठलाही प्राणी जो दूध पितो त्याला स्तन असतात. जगात कुठल्याही सापाला स्तन नाहीत. आता जगात दूध पिणारा कुठलाही प्राणी अगदी कुठलाही प्राणी पहा त्याला स्तन असतातच.

जगातील कुठलाही साप जन्मतः पूर्णपणे मांसाहारी असतो आणि लगेच शिकार करण्यास तो सक्षम देखील असतो. सापाला दूध पाजणारे लोक हे सापाला दूध नाही तर त्याला विषच पाजत असतात, कारण या सापांना काही दिवस उपाशी ठेऊन त्यांना दूध पिण्यास प्रवृत्त केले जाते. सापाला दूध पचत नसते, त्याची शरीर रचना पुर्णपणे वेगळी असते. उपाशी असल्याने साप पाणी समजून दुध पिऊन जातो आणि अगदी २० ते २५ दिवसात मरून जातो. या मृत्यूला जबाबर कोण ? तर माणूस. माणसाने यापासून स्वतःला परावृत्त करायला हवे. कालसर्प योग याच्या नावाखाली नाग सापाचे शोषण केले जाते. या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहे हे सिध्द झालेले असतानाही लोक पुन्हा त्याच मार्गाला जातात.

नागांविषयी आणखीन एक भाकड कथा म्हणजे नाग बदला घेतो. भारत देशात नाग जेवढा अभ्यासू पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला नाही तेवढा हिंदी सिनेमा मधून अज्ञानी पद्धतीने पोहोचला आहे. नागा बाबत असलेली आणखीन एक अंधश्रद्धा म्हणजे त्याच्या डोक्यावर नागमणी असतो. काहीजण सोशल मीडियावर असे मणी असलेले व्हिडीओ अपलोड करतात. नाग या सापात कुठलाही मणी नसतो, तो असतो असे दाखवण्याचा धंदा मात्र बऱ्याच भोंदू लोकांना असतो आणि अशा भोंदुंना अज्ञानी लोक बळी पडतात.

जगात साप या प्राण्याला तुम्ही काहीही शिकवू शकत नाही. सापाला कशाचेही ट्रेनिंग दिले जाऊ शकत नाही. ते निसर्गतः जसे आहेत ते कुठेही असले तरी तसेच राहतात. तुम्ही सापाला ज्यावेळी धोकादायक वाटता, साप त्यावेळीच तुमच्यावर हल्ला करतो. सापाने स्वतःची वाट बदलून, माणसाच्या मागे पळून माणसावर हल्ला केल्याची घटना शोधूनही मिळणार नाही. रेस्क्यू केलेले ९९ % साप रिलीज करताना लगेच आपल्या वाटेला निघून जातात मागे वळूनही पाहत नाहीत. क्वचित साप असुरक्षित वाटल्याने थांबतो आणि पुन्हा आपल्या वाटेला निघून जातो.

आज साप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात त्यांना सोडले जाते. हे करत असताना सापांविषयी लोकांच्या अज्ञानाचे विशेष वाटते. महत्वाचे म्हणजे लोकांना एखाद्या सापाचे ज्ञान दिले तरीही लोक त्यांच्या जुनाट धारणा धरुनच बसलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर निघायचे नसते. या धारणांचा नाहक त्रास वन्य जीवांना होतो व त्याचा जाच त्यांना सहन करावा लागतो. साप हा निसर्गातील एक प्राणी आहे. एवढीच त्यांची ओळख आहे. त्यात विषारी, बिनविषारी आणि निमविषारी या तीनच प्रजाती आहेत. या सर्व प्रजाती मांसाहारी आहेत. बहुतांश साप उंदीर, घुशी, बेडूक खातात. जे प्राणी माणसासाठी उपद्रवी आहेत असे प्राणी साप खातात. त्यामुळे सापाला माणसाचा मित्र म्हंटले आहे. ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ असे आहे हे..

साप चावल्यावर काय करावे ?
साप चावल्यावर १ सेकंद ही वाया न घालवता सरकारी हॉस्पटलमध्ये जावे. बाकी जे करायचे ते डॉक्टर करतात. तुम्ही ते सांगतील तेवढं व्यवस्थित करा. त्यांना सहकार्य करा. त्यांना अधिकचे ज्ञान देत बसू नका. ते त्याबाबत तुमच्या पेक्षा जास्त ज्ञानी असतात…

फक्त सापच नाही तर कुठल्याही प्राणी किंवा गोष्टी विषयी अज्ञान बाळगू नका. अज्ञानाने अफवांची निर्मिती होते. सापांविषयी अशा हजारो अफवा आहेत. अशा अफवा पसरवू नका. नाग फक्त पुजू नका त्याची व्यवस्थित माहिती घ्या. अंधश्रद्धेतून बाहेर निघा. जगा आणि जगू द्या..

सर्पमित्र – पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा