भाजपा नगरसेवक महेशराव लडकत यांचे निधन

पुणे, २९ डिसेंबर २०२०: भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष महेशराव लडकत यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून ते आजारी होते. त्यातच फुफ्फुसाचा आजार बळावल्याने त्यांचे निधन झाले. ते वय ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन बंधू आणि एक भगिनी असा परिवार आहे.

विद्यार्थी असतानाच त्यांनी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांसाठी काम करायला प्रारंभ केला. गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. पतित पावन संघटनेनंतर त्यांनी भाजपाच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवले.

शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. उद्यम बँकेचे विद्यमान अध्यक्ष म्हणूनही ते काम पहात होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना प्रभाग क्रमांक २९ (नवी पेठ – पर्वती) मधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती.

आज सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता नवी पेठेतील त्यांच्या संपर्क कार्यालयात अंत्यदर्शनासाठी पार्थिव आणण्यात येईल आणि ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा