भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा तीन जुलैला नाशिक दौऱ्यावर

नाशिक २७ जून २०२३: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षपूर्ती निमित्त भाजपकडून राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.

याचाच एक भाग म्हणून जे. पी. नड्डा हे दि.३ जुलैला नाशिकमध्ये येऊन पक्षाचा आढावा घेणार आहेत. ठक्कर डोम येथे नड्डांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची नाशिक कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून, त्यानंतर ते जाहीरसभेला संबोधित करतील. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी नाशिकमध्ये उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले.

भाजपने राज्यातील ४५ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवरुन तेवढे खासदार केंद्रात पाठविण्यासाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी केली केली जातेय. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील १३ लोकसभा मतदारसंघातही भाजपकडून चाचपणीवर भर दिला जातोय. यामध्ये सेनेच्या ताब्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळेच भाजपने थेट नड्डा यांनाच नाशिकमध्ये आणण्याची तयारी सुरू केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा