कर्जत, ६ ऑगस्ट २०२०: दुध आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व प्रशासनाने एकाच तालुक्यात दुजाभाव करू नये अशी अपेक्षा ही व्यक्त केली आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी तालुक्यातील माहीजळगाव या ठिकाणी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले होते. यानंतर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये प्रा राम शिंदे सह २८ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला याचे तीव्र पडसाद उमटले, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध ही नोंदवला होता तालुक्यात सुरू असलेल्या राजकारणावर रंगतदार चर्चा ही झाली होती. यानंतर आज भाजपच्या पदाधिका-यांनी निवेदन देत सदरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली या निवेदनात म्हटले आहे की लोकशाही मार्गाने कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सॅनिटायझर, मास्कचा वापर करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाला कायदे आणि नियमांच्या चौकटीत कारभार करताना स्वेच्छाधिकार असतो आणि तो असलाही पाहिजे. मात्र कर्जत तालुक्यात लोकाभिमुख प्रशासनाचा (रिस्पॉन्सिव्ह अॅडमिनिस्ट्रेशन) अभाव दिसतो आहे.
कर्जत जामखेड मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. त्यांच्या बरोबर शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने त्यांच्या दिमतीला दिसत आहेत. लोकप्रतिनिधी बाहेरील जिल्ह्यातून नेहमीच ये जा करत असताना स्वतःला कधीही कॉरन्टाईन केल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या या वागण्यामुळे मतदार संघातील जनतेला असुरक्षितता वाटत आहे. लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असताना काही वेळा मास्कचा वापरही करताना दिसत नाहीत. मतदार संघात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करत हिंडणे फिरणे कितपत योग्य आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या नियमांच्या उल्लंघनाची त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.? असा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मिटींग व त्यांचे दौरे यांचे फोटो सोशल मीडिया, वृत्तपत्र यामध्ये सातत्याने पहावयास मिळतात मात्र त्यावर कारवाई का होत नाही असे विचारत प्रशासनाच्या माहितीसाठी असे फोटोही या निवेदना बरोबर जोडण्यात आले आहेत.
राजकीय दबावाखाली पक्षपातीपणे एकाच मतदारसंघात दोन वेगवेगळे न्याय प्रशासनाकडुन होऊ नयेत. अशी अपेक्षा व्यक्त करताना या संकटकालीन परिस्थितीत प्रशासनाने लोकाभिमुख कारभार करणे गरजेच आहे. प्रशासनाने सर्वां प्रति समानत्व बाळगलं पाहिजे. प्रशासनाचा कारभार हा लोकांना उत्तरदायी आहोत, या भावनेनं झाला पाहिजे. प्रशासनातल्या कार्यपद्धतीही प्रमाणित (स्टँडर्डाइज) म्हणजेच सर्वाना एकसमान न्याय देणाऱ्या असाव्यात. अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रशासनाने चुकीच्या व पक्षपाती पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत ते पाहता हा लोकाभिमुख प्रशासकीय कारभार होऊ शकत नाही. सर्वांप्रती समानत्व बाळगत प्रशासकीय कारभार होणे अपेक्षित आहे.
अशी अपेक्षा व्यक्त करताना लवकरात लवकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत व सर्वांना समान न्याय या भावनेतून प्रशासकीय कारभार करावा अशी विनंती ही करण्यात आली आहे. या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उप नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, तालुका संघटक पप्पशेठ धोदाड, सरचिटणीस उमेश जेवरे, जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, स्वप्निल देसाई, काकासाहेब धांडे आदीच्या सह्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष