सातारा, दि, ९ मे २०२३ -: साताऱ्यात बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश एकनाथ शिंदे यांना मानावाचं लागतो, अशी टीका शरद पवार यांनी केली.
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. सामनातील अग्रलेखावरही शरद पवार यांनी परखड भूमिका मांडली. तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे. आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहित नाही.संजय राऊत यांच्या लिखाणाला मी महत्त्व देत नाही त्याकडे दुर्लक्ष करतो. मी राजीनामा दिल्याने पक्षाने जोमाने कामाला सुरुवात केली. त्याचा पक्षाला फायदा होईल.
१९९९ साली सत्तेत गेले तेव्हा आम्ही अनके सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री केले. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते, याची खात्री आमच्या सर्व नेत्यांना आहे. आम्ही तयार केलेल्या नेत्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आमच्यात काही गैरसमज नाही. असेही शरद पवार म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्षावर बोलताना शरद पवार म्हणाले, सत्ता संघर्षाचा निकाल लवकर येईल. यावर आपली दिल्लीतील वकिलांशी चर्चा झाली आहे. ज्या खंडपीठांसमोर ही सुनावणी चालली, त्यातील एक न्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्या आधी कोर्टाला हा निकाल घ्यावा लागेल असे मतही पवार यांनी यावेळी नोंदवले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर