शेअर बाजाराच्या जाळ्यात अडकले ‘माजी’,कोट्यवधींचा गंडा घालून दोघांना ठोकल्या बेड्या.

16
Block Trade IPO
‘ब्लॉक ट्रेड’ आणि ‘आयपीओ’ नाव सांगून स्वप्न दाखवले.

Block Trade IPO:पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारांनी आता थेट ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दिघी येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी नऊ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. या धक्कादायक फसवणुकीच्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तत्परता दाखवत दोन आरोपींना गुजरातच्या अहमदाबाद शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.

‘ब्लॉक ट्रेड’ आणि ‘आयपीओ’ नाव सांगून स्वप्न दाखवले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भौमिक भरतभाई पटेल (वय २९) आणि आकाश पोपटभाई रादडिया (वय २४) असून दोघेही अहमदाबादचे रहिवासी आहेत. या दोघांनी सोशल मीडियाचा वापर करत आपल्या जाळ्यात ज्येष्ठ नागरिकाला ओढले. फेसबुकच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला ऑनलाइन ट्रेडिंगची लिंक पाठवली. यानंतर त्यांना एका व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगितले.

आरोपींनी बनावट ‘ब्लॉक ट्रेड’ आणि ‘आयपीओ’ नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवण्याचे स्वप्न दाखवले. हळूहळू विश्वास संपादन करत त्यांनी फिर्यादीला मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले.

सुरुवातीला गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून दाखविल्यामुळे फिर्यादीचा विश्वास आणखी दृढ झाला. मात्र, जेव्हा फिर्यादीने गुंतवलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी वेगवेगळ्या शुल्काची मागणी करण्यास सुरुवात केली आणि याचमुळे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच, सायबर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचे ठिकाण शोधून काढले. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी अहमदाबाद येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या घटनेमुळे ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे