“त्या” कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास कारवाई: जिल्हाधिकारी

पुणे : जर कोणत्याही व्यक्तीने कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.
कोरोना संदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्णासोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला तर, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. याशिवाय संबंधित सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनाही जबाबदार धरण्यात येईल.अशा परिस्थितीत कारवाई करणे अपेक्षित नाही, पण तुम्हीही सहकार्य करा. रुग्ण किंवा कुटुंबीयांना चांगली वागणूक द्या.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले की, शहरातील भाजीपाला, औषध दुकाने आणि मॉलमधील दैनंदिन खाद्यवस्तूंची विक्री सुरू राहील. ती बंद होणार नाही. शहरात काही भागात कलम १४४ लागू करण्याचा विचार असून लवकरच आदेश काढला जाईल.अशी माहिती त्यांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा