नागपूरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये नोंद; नितीन गडकरी म्हणाले…

नागपूर, ७ डिसेंबर २०२२ :ऑरेंज सिटीच्या नावाने केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपूरच्या नावाची थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. शहरातील प्रत्येकच नागरिकासाठी ही ‘अभिमानास्पद’ बाब आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि महा मेट्रोच्या (Maha Metro) टीमने नागपूरमध्ये सिंगल कॉलमच्या आधारावर महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (३.१४ किमी) बांधून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महा मेट्रो टीमचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, या प्रकल्पाने यापूर्वीच एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे. यानंतर आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा प्रतिष्ठित सन्मान मिळणे आमच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद क्षण आहे.

पुढे ते म्हणाले, हे घडवून आणण्यासाठी २४ तास प्रयत्न करणारे अतुलनीय अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना सलाम करतो. अशाप्रकारचा विकास म्हणजे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

  • डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा सत्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सांस्कृतिक महोत्सवात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. महामेट्रो नागपूरच्या वर्धारोड डबलडेकर व्हायाडक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याने गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा