नागपूर, १० फेब्रुवारी २०२४ : दीक्षाभूमि वर बसविण्यात येणारी बुद्धमूर्ती इतरत्र स्थानांतरीत करून माता रमाईचा पुतळा स्थापित मागणी महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी आणि सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी खैरकर यांनी आज पत्रपरिषदेत केली.
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर थायलंड येथून आलेली ५६ फुट उंच असलेली भगवान बुद्धाची मुर्ती बसविण्याची स्मारक समितीची घोषणा पूर्णतः चुकीचीं असून बौद्ध समाजात आनंदासोबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीचा विरोध कोणताही बौद्ध करणार नाही परंतु दीक्षाभूमीवर किती मूर्त्या बसवायच्या? हा प्रश्न पडलेला आहे. अगोदरच दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अस्थींसोबत भगवान बुद्धाची मुर्ती स्मारकाच्या आतमध्ये आहे. सोबतच पुन्हा एक बुद्ध मुर्ती उभी आहे. स्मारकाच्या बाहेर बाबासाहेबांच्या पुतळयासोबत बुद्धाची भव्य मोठी मुर्ती विराजमान आहे. स्तूपाच्या डोममध्ये एक मुर्ती वरच्या माळयावर वंदनार्थ ठेवलेले आहे. आजच्या परिस्थितीत ५ भगवान बुद्धाच्या भव्य मूर्ती दीक्षाभूमीवर आहेत. मग पुन्हा ही ५६ फुट उंचीची बुद्ध मुर्ती कशासाठी?
दीक्षाभूमीवरील सर्व भगवान बुद्धाच्या मूर्ती थायलंड या बौद्ध देशातूनच आलेल्या आहेत हे महत्वाचे आहे. या ५६ फुट उंचीच्या बुद्ध मुर्तीला बसविण्यासाठी दोन एकर जागा लागणार आहे. परंतु दीक्षाभूमी वर एवढी मोठी जागा कुठे आहे? सर्वात महत्वाचे म्हणजे एवढी मोठी मूर्ती बोलविण्याचे प्रयोजन कशासाठी व कोणी ही मुर्ती बोलविली आहे? अगोदरच ५ बुद्ध मूर्ती दीक्षाभूमीवर असतांना ५६ फुट उंचीची बुद्ध मूर्ती आणण्याची गरज काय? स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही असे त्यांनी सांगितले. स्मारक समितीच्या बैठकीत कधीही याविषयी चर्चा करण्यात आली नसल्याचे सदस्य सांगतात.
मग ५६ फुट उंचीची बुद्ध मुर्ती आणण्याचा निर्णय कुणाचा? अध्यक्षांचा की स्मारक समिती की थायलंडचे लोक जबरदस्तीने या मूर्ती पाठवितात. याविषयी स्मारक समितीची बैठक नाही, समितीचा निर्णय नाही. मग दीक्षाभूमीवर वाट्टेल तो निर्णय घेण्याचा अधिकार कुणाकडे आहे? यावर बौद्ध संघटनांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दीक्षाभूमी ही आंबेडकरी बौद्धांसाठी श्रद्धेचा विषय, दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी, मातृभूमी, आंबेडकरी समाजासाठी जीव की प्राण, मग या दीक्षाभूमीवर जे काही घडते, ते समाजाला किंवा समितीच्या सदस्यांना तरी विश्वासात घ्यायला नको काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरासारख्या उत्तुंग हिमालयाला सावली देणारी त्यागभुमी रमाई. ती नसती तर भीमरावाचे बाबासाहेब झालेच नसते. त्या रमाईच्या स्वप्नातलं हे नवे पंढरपूर. रमाईला दिलेले दान, तीच्या एकमेव मागणीची पूर्तता, ही दीक्षाभूमी. मग त्या रमाईंचा पुतळा दीक्षाभूमीवर नको का? देशातील कोट्यावधी आंबेडकरी महिलांची हृदयातली मागणी लेखकांच्या, विद्वानांच्या लेखणीतली आवडती ओळ, या गोष्टीच भान स्मारक समितीला का नाही? दीक्षाभूमीचे विदेशीकरण होऊ नये.
- भगवान बुद्धाचा धम्म २५०० वर्षापूर्वीच जगभर गेला. ख्रिश्चन-मुस्लीम धर्माच्या ५०० वर्षाअगोदरच तो धम्म जगात आहे. आंबेडकरी समाज जगभराचा प्रवास करीत असून स्वतःला सामावुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. देशविदेशात जात आहे. प्रत्येक देशाची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्या-त्या देशातला धम्म याचे अध्ययन मोठ्या प्रमाणावर होत आहे व म्हणूनच तथागतांच्या मूर्तीचा विरोध नाही.
- तथागत भगवान बुद्धांची ५६ फुट मुर्ती नागपूरच्या आसपास असलेल्या बुद्धीस्ट स्थळांवर आदराने बसवावी.
- आंबेडकर कॉलेजच्या मागची जागा (कृषी महाविद्यालयाची) स्मारक समितीच्या ताब्यात घ्यावी.
- दीक्षाभूमीवर यापुढे कोणतेही बांधकाम करू नये. वीस लाख लोकांना उभे राहता येईल याची व्यवस्था करावी.
- दीक्षाभूमीवर क्रिकेट क्लब बंद करून ती जागा आंबेडकरी समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावी.
- बाबासाहेबांच्या स्मारकाचे चारही दरवाजे खुले करून चहुबाजूने मुख्य रस्त्याला जोडण्यात यावे.
- दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी अ-दर्जाप्राप्त असलेल्या पर्यटन स्थळांच्या सुविधा प्राप्त करण्यास प्रयत्न करावे.
अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या परिषदेमध्ये भदंत हर्षबोधी, भैय्याजी खैरकर, संजय मून, नरेश गायकवाड, प्रमिलाताई टेंभेकर, ज्योती बेले, एडवोकेट स्मिताताई ताकसांडे, मनीषा भगत आणि तरुलता कांबळे यांची उपस्थिती होती.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे