मुंबई,१३ जुलै २०२३ : दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात होते. काल अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. आज किंवा उद्याच हा विस्तार होईल असेही सांगितले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर संभाव्या मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मागील आठ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी या बैठका सुरू होत्या. मात्र, अर्थ खाते, सहकार आणि ग्रामविकास या तीन खात्यावरून वाद होता. शिंदे गटाने अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास विरोध केल्याने हा तिढा अधिकच वाढला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला होता. त्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होती.
मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच वर्षावर बैठकही बोलवण्यात आली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खाते वाटप आणि विस्तारावर शिंदे गट आक्रमक झाल्याने हा विस्तार रखडला आहे. तसेच शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपद मिळत नसल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी तर पत्रकार परिषद घेऊन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात आमदारांची नाराजी नसावी आणि अधिवेशन सुखरूप पार पडावे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता विस्तार अधिवेशनानंतरच केला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर