मृत रुग्णांच्या उपचारावर ६.९७ कोटींचा खर्च, PMJAY योजनेवर ‘कॅग’चे ताशेरे

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२३ : आयुष्यमान भारत योजनेबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. आधीच मृत्यू झालेल्या ३,४४६ रुग्णांच्या उपचारासाठी एकूण ६.९७ कोटी रुपये देण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण डेटाबेसमध्ये मृत दाखवण्यात आले आहेत.

योजनेच्या डेटाबेसचे ऑडिट करण्यात आल्यानंतर त्यात अनियमितता आढळून आली. योजनेच्या व्यवहार व्यवस्थापन प्रणालीमध्ये आधीच मृत झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी पैसेही दिले गेल्याचे समोर आले होते. हजारो रुग्णांवर आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार होत असल्याचे दाखवले जात होतं.

आयुष्यमान भारत योजनेबाबत याआधीही कॅगच्या अहवालात एकाच मोबाईल क्रमांकावर ७.५ लाखांहून अधिक लोकांची नोंदणी करण्यात आली होती आणि तो क्रमांकही अवैध असल्याचे सांगण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील गरीबांना मोफत उपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे, परंतु योजनेसंदर्भात नवनवे धक्कादायक खुलासे होत असल्याने साशंकता निर्माण झालीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा