नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी २०२३ :दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उद्या सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. स्वतः मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सीबीआयने उद्या पुन्हा बोलावले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. याबाबत माहिती देताना मनीष सिसोदिया यांनी ट्विटमध्ये सांगितले की, सीबीआयने उद्या मला पुन्हा बोलावले आहे. त्यांनी माझ्याविरोधात सीबीआय, ईडीची संपूर्ण शक्ती वापरली आहे. घरावर छापे टाकले, बँक लॉकर्सची झडती घेतली, तरी देखील माझ्याविरोधात कुठेही काही सापडले नाही. मी दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी चांगली शिक्षण व्यवस्था केली आहे. मात्र, त्यांना त्याला थांबवायचे आहे.
- तपासात मी नेहमीच सहकार्य केले
पुढे ते म्हणाले, आता त्यांनी मला उद्या पुन्हा बोलावले आहे. तपासात मी त्यांना नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करेन, असेही सिसोदिया यांनी यावेळी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.