सातारा येथे ३४८ वर्षांच्या जुन्या राजगादीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने उजाळा मिळणार

सातारा, १८ फेब्रुवारी २०२३ : तब्बल ३४८ वर्षे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपून ठेवलेले, सातारा येथील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला तिथून मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ते पुन्हा सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असा प्रवास करीत आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त शिवजंतीच्या पार्श्वभूमीवर सातारकरांसाठी खुले करण्यात आले आहे.

विद्युतरोषणाईने नटवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेली शिवरायांची ही राजगादी औत्सुक्याचा, कुतूहलाचा व श्रद्धेचा विषय ठरली आहे. छत्रपती घराण्याची महती जगभर आहे. इतिहासकालीन राजघराणे व त्याकाळातील सुवर्ण युगाविषयीच्या माहितीचे पुरावे आजही पाहावयास मिळतात. त्यातील अनेक पुरावे हे देश-विदेशांतील अनेक संग्रहालयांत जपून ठेवण्यात आले आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त हे तख्त विशेष सुरक्षाव्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या मुख्य दालनामध्ये सातारकरांना पाहण्यासाठी कालपासून खुले करण्यात आले आहे. तख्त व शिवप्रतिमेचे पूजन सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा