कोलेस्टेरॉलची काळजी पंचविशीतच घ्या

कोलेस्टेरॉल म्हणजे एक प्रकारची चरबी, जी काही अन्नपदार्थांमध्येही असते आणि आपल्या यकृतात तयार होते. लोकांनी आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी पंचविशीतच तपासावी, असं संशोधकांचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढलं नसलं तरी पंचविशीत त्याची जी पातळी असेल त्यावरूनच भविष्यात हृदयविकाराचा किती धोका आहे ते कळू शकतं.
लॅन्सेट’ नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये हे नवीन संशोधन प्रसिद्ध झालं आहे. यात अनेक वर्ष शरीरात ‘बॅड कोलेस्टेरॉल’ साठलं तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सखोल चर्चा झाली आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डाएट आणि औषधांनी जितक्या कमी वयात प्रयत्न सुरू होतील तितकं चांगलं असं या अभ्यासात म्हटलं आहे.
कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.

हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल – या कोलेस्टेरॉलला ‘गुड’ कोलेस्टेरॉल असं म्हणतात. कारण यामुळे शरीर तंदुरुस्त राहातं.

लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल – या ‘बॅड’ कोलेस्टेरॉल म्हणतात कारण याने आपल्या हृदयाजवळच्या धमन्या ब्लॉक होतात.

अभ्यासकांनी 19 देशांमधल्या 4 लाखाहून अधिक माणसांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांच्या असं लक्षात आलं, की कमी वयात ज्या लोकांचं बॅड कोलेस्टेरॉल जास्त असतं त्यांना चाळीशीनंतर हृदयविकारचा अधिक धोका असतो.
पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांचं लिंग, वय, त्यांच्या शरीरात असणाऱ्या बॅड कोलेस्टेरॉलची पातळी, डायबेटिस, ब्लड प्रेशर, वजन, उंची आणि धूम्रपानाचं व्यसन या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना कधी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला.
एका आकडेवारीनुसार दर ५० पैकी १ व्यक्ती जी कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधं घेते, तिला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. सदृढ जीवनशैली, व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यामुळेही कोलेस्टेरॉल कमी होतं.

तिशीतल्या लोकांनी कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधं घ्यावीत का?

अगदीच तशी आवश्यकता नसेल तर नाही. अभ्यासकांनी कोणत्याही प्रौढ व्यक्तीने हाय कोलेस्टेरॉलसाठी गोळ्या घ्याव्यात, असं थेटपणे सांगितलेलं नाही.
प्रोफेसर ब्लँकेनबर्ग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “तरूणांनी आपली कोलेस्टेरॉल पातळी जाणून घ्यावी आणि सर्वसमावेशक विचार करून निर्णय घ्यावा. मग कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गोळ्या घ्यायच्या असल्या तरी निर्णय त्यांनी स्वतः घ्यायला हवा.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा