चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह तिघांवर गुन्हा

28

बीड, दि.२७ मे २०२० : वाळू वाहतूकीचा आणि गौण खनिज कर भरल्याचा कोणताही परवाना नसतानाही अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरातील जालना रोडलगतच्या कॅनाल परिसर व चर्‍हाटा फाटा परिसरात या कारवाया केल्या. दोन वेगवेगळ्या कारवायांत तिघांना पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनसे जिल्हाध्यक्ष वैभव काकडेंचा समावेश आहे.
२ टिप्परसह ११ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि.२५) रात्री गुन्हे शाखेचे विशेष पथकाने चर्‍हाटा फाटा परिसरातून नगर नाक्याकडे आलेला एक टिप्पर (क्र.एम.एच.१६ सीई ९३९३) पथकाने थांबवला.यात 6 ब्रास वाळू आढळून आली. मात्र वाळू वाहतूकीचा शासनाचा परवाना आढळून आला नाही. चालक जीवन लक्ष्मण इंदूरे (४५ रा.दगडी शहाजानपूर,ता.बीड) व मालक वैभव चंद्रकांत काकडे (३६ रा.इंद्रप्रस्थ कॉलनी,बीड) या दोघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून २ टिप्पर व ६ ब्रास वाळू असा २५ लाख ४२ हजार रु.किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर दुसरी कारवाई मंगळवारी (दि.२६) पहाटे सव्वापाचच्या सुमारास शहालगतच्या कॅनॉल रोडवर केली गेली. टिप्परमधून (क्र.एम.एच.१२ के.पी. ८१७९) ५ ब्रास वाळूची वाहतूक करणार्‍या सुदाम कल्याण सोनलकर (२२, रा.शहाजानपूर,ता.बीड) यास ताब्यात घेत विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा शासकीय परवाना नव्हता. संबंधितांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीसांनी टिप्पर व ५ ब्रास वाळू असा २५ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक आनंद कांगुणे, पो.ना.झुंबर गर्जे, पो.ना.सखाराम पवार, पो.कॉ. गोविंद काळे, चालक पो.ना. गहिनीनाथ गर्जे यांनी ही कारवाई केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: