सांगली, ५ ऑगस्ट २०२३ : सांगलीतील इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर काँग्रेसने दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला आहे. इस्लामपूरमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी इस्लामपूरमधील राष्ट्रवादीचे कार्यालय काँग्रेसच्या ताब्यात देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी या नेत्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
पक्ष कार्यालयावरून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. पक्ष कार्यालय राष्ट्रवादीचेच आहे. आतापर्यंत काय झोपला होता का? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाने केला आहे. तर कार्यालयात राजारामबापूंचा संबंध नाही. राजारामबापूंनी मालक होण्याचा प्रयत्न केला. भाड्याच्या घरात राहण्याने मालक होता येत नाही. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा आणि कार्यालय मोकळे करा, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
या वादविवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशाप्रकारे आमनेसामने आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पक्ष कार्यालयावरुन वाद झाला होता. पण आता सांगलीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत हा वाद सुरु असल्याचे समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर