कोरोना चाचणी खासगी लॅब्स मध्ये शक्य

नवी दिल्ली: देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तपासणीसाठी खासगी रुग्णालयात लॅबला परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

शरीरातील तापमान ३८ अंशाहून अधिक वाढणे, सर्दी-खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत. यापैकी काही जाणवू लागले तरी रुग्ण आता थेट लॅब गाठत आहेत. त्यामुळे लॅबवर ताण पडतोय. यासाठी आयसीएमआरने निर्देश दिले आहेत. सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंगसाठी देखील सुचना केल्या आहेत. कोरोना संशयित रुग्णांचे स्वतंत्ररित्या घेण्यात यावे असे यात म्हटले आहे. अधिकृत वैद्यकिय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानंतरच रुग्णाची कोरोनाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खासगी रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूच्या तपासणी शुल्क हे सरकारी रुग्णालयाप्रमाणेच असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या निर्णयामुळे सद्याच्या परिस्थितीत मोजक्या सरकारी रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

या चाचणी दरम्यान जनतेची आर्थिकदृष्ट्या फसवणूक टाळण्यासाठी तसेच अधिक सुरक्षित तपासणी होण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) खासगी लॅबला कोरोना रुग्ण तपासणीसाठी निर्देश जारी केले आहेत. यानुसार कोरोना तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडून ४ हजार ५०० रुपयांपर्यंतच रक्कम आकारली जावी. यामध्ये स्क्रीनिंग टेस्टसाठी १,५०० तर इतर अतिरिक्त चार्जचे ३,५०० रुपयाचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत ७  हजार लोकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहाय्यक सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी दिली.सर्दी, खोकला आणि ताप असल्यास सर्वच रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येणार नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार रुग्णांची तपासणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.  मास्क आणि सॅनिटायझर्सचा कोणाताही तुटवडा नसून खरेदीसाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गडबड गोंधळ करु नये, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा