नांदेड, २७ फेब्रुवारी २०२४ : निष्पर्ण आणि ओसाड दिसनारे माळरान उन्हाच्या काहिलीत जेव्हा तप्त व्हायला लागते, तेव्हा शिशिराची थंडी ओसरून वसंत ऋतूच्या आगमनासाठी अवघी सृष्टी जणू नवं रूप परिधान करण्यासाठी आसुसलेली असते. माळरानावर निष्पर्ण झालेल्या पळसाच्या गर्द केशरी रंगाच्या फुलांची आरास जणू नटविण्यासाठीच बहरली आहे की काय? असा प्रश्न कविमनात निर्माण होतो. मार्च महिन्यात असलेल्या धुलीवंदनासाठी पळसफुलांचा हा रंगोत्सव आतापासूनच भुरळ घालत आहे. या फुलांपासून तयार केलेला रंग ग्रामीण भागात आजही खेळला जातो.
किनवट, माहूर, कंधार आणि मुखेड या तालुक्यातील बहुतांश गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. कधी पाऊस जेमतेम, कधी अतिवृष्टी तर कधी पाण्यासाठी ठणठणाट अशी परिस्थिती असते. जमिनीचा पोत साधारण असल्यामुळे काटेरी झुडपे, बाभळी, कडुनिंब, बोर, पळस, साग, आंबा, सीताफळ यांसह इतर निसर्ग वृक्षसंपदा कमी-अधिक प्रमाणात आहे. खरिपाचा हंगाम संपला की, उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी अखेर शेतशिवार ओसाड दिसायला लागतं. मात्र वसंत ऋतूत माळरानावर पळस फुलांना बहर आल्याने मनमोहक फुलांची अनेकांना भुरळ पडत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गौतम कांबळे