पुणे, ६ सप्टेंबर २०२३ : गुरुवार ७ सप्टेंबर रोजी गोकुळ अष्टमीला दहीहंडीचा उत्सव रात्री १० वाजेपर्यंतच साजरा होणार आहे. पुणे पोलिसांनी दहीहंडी उत्सवाची अंतिम मुदत जाहीर केली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दहीहंडी साजरी करण्यास परवानगी मागितली होती, असे स्पष्टीकरण शहर पोलिसांनी दिले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच दहीहंडीबाबत राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरात रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक नुकतीच झाली. ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सवाला मध्यरात्री १२ पर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ शकत नाही.
वास्तविक, मुंबई शहरात दुपारच्या सुमारास दहीहंडी उत्सव सुरू होतो. जे रात्री १० च्या आधी संपेल. पण पुण्यात संध्याकाळी दहीहंडी उत्सवाला सुरुवात होते. आणि रात्री १० वाजेपर्यंत बंद करणे शक्य नाही. त्यावर अजित पवार म्हणतात की, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही दहीहंडी उत्सव दुपारीच सुरू करावा तसेच मंडळांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनीं अवास्तव मागण्या करू नयेत, असा सल्ला पवारांनी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड