धनंजय मुंडेंना बहीण पंकजा मुंडेंकडून औक्षण करून शुभेच्छा !

मुंबई, ७ जुलै २०२३ : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली आहे. सत्ता, राजकीय इर्षेपोटी सख्खी, रक्ताची नाती परस्पररापासून दुरावत चालली आहेत. त्याचवेळी राजकारणामुळे दुरावलेले एक नात जवळ येत असल्याचे पाहायला मिळत आहे.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावाच्या नात्यातील एक भावनिक क्षण पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिला. राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती झाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांच्या नात्यांमध्ये एक मायेचा ओलावा दिसून आला.

काही वर्षांपूर्वी धनजंय मुंडे यांनी दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे परस्परांचे राजकीय विरोधक बनले. राजकारणामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना परस्पराविरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. आता राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे बहिण-भाऊ दोघे एकाच सरकारमध्ये आले. पण विधानसभेचा मतदारसंघ एकच असल्याने पंकजा मुंडे विधानसभेची निवडणूक कोणत्या मतदार संघातून लढवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या पंकजा मुंडे या वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा आहे. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलल जात आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलवली आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा