धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी; शेतकरी आत्महत्या

धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा कळंब या अतिवृष्टीग्रस्त भागांना राज्याचे दोन उपमुख्यमंत्री भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच एक दुखद घटना घडली.

मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42) यांनी शेतजमिनीचे नुकसान आणि वाढते कर्ज यामुळे तणावाखाली येऊन गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लक्ष्मण बाबासाहेब पवार यांची शेतजमिनी नदीकाठावर होत्या. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जमीन खरवडून गेली, तर सोयाबीन व कांद्याचे पीक पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे दोन ट्रॅक्टर कर्जाची परतफेड करण्याची विवंचना त्यांना सहन करावी लागली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

या घटनेने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी रहीम शेख धाराशिव