कोलकत्ता, ९ मार्च २०२१: चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचारामध्ये गुंतले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्याच्या मोहिमेवर व्यस्त आहेत. दरम्यान, या राज्यांमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल याविषयी टाइम्स नाऊ आणि सी व्होटर्सनी सर्वेक्षण केले आहे.
सर्वेक्षणानुसार डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) केरळमध्ये परतण्याची शक्यता आहे. एकूण १४० जागांपैकी ८२ जागा एलडीएफ जिंकू शकतात. दुसरीकडे, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) ५६ जागा जिंकू शकते तर भाजपला फक्त एक जागा जिंकता येईल.
या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूमध्ये सत्ता बदलण्याची चिन्हे आहेत. एआयएडीएमकेच्या नेतृत्वात युतीला केवळ ६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी द्रमुकच्या नेतृत्वाखालील यूपीए युती १५८ जागा जिंकू शकते. एकूणच तामिळनाडूमध्ये यूपीए सरकार स्थापनेची चिन्हे आहेत.त्याचबरोबर पुडुचेरीमध्ये एनडीए सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या ३० जागांपैकी त्याला १६ ते २० जागा मिळू शकतात.
आसाममध्ये भाजपच्या परतीचा अंदाज……
या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा आसाममध्ये परत येऊ शकेल. आसाममधील एनडीए आघाडीला १२६ पैकी ६७ जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र, यूपीए यावेळी चांगली कामगिरी करू शकेल आणि ती ३९ जागांवरून ५७ जागांवर वाढू शकेल. इतरांना दोन जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. आसामच्या 126 सदस्यांच्या बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक आहेत.
टीएमसीचे बंगालमध्ये परत येण्याची शक्यता…..
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला १४४ आणि भाजपाला १०७ जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील निवडणुकीत २०१६ मध्ये टीएमसीने २११ जागा जिंकल्या आणि भाजपाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. या सर्वेक्षणानुसार टीएमसी बंगालमध्ये परत येत आहे पण जागा कमी होत आहेत तर भाजप पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव