जायकवाडी धरणातून ९४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पैठण, १८ सप्टेंबर २०२०: पैठण येथील जायकवाडी धारण हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यंदाच्या जोरदार पावसामुळं धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहात आहे. गेल्या आठवड्यातच रविवारी (ता.१३) धरणातून २५ हजार क्‍युसेकनं पाणी सोडण्यात आलं होतं. त्यावेळी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, आज धरणात एकूण पाणीसाठा २८९७.१०० घन मीटर असून त्याची एकूण टक्केवारी ९९.४४ टक्के इतकी झालीय. तर धरणातील जिवंत पाणीसाठा २१५८.९९४ घन मीटर इतका आहे.

त्यामुळं जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पत्रात ९४ हजार ३२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे २ ते ४ फुटानं उघडून विसर्ग सुरु आहे. धरणाचे १० ते २७ दरवाजे चार फुटानं उघडले, तर १ ते ९ दरवाजे दोन फुटानं उघडलेत. आज पहाटे ५ च्या सुमारास धरणातून ९४ हजार क्युसेक विसर्ग सुरु झालाय.

सध्या धरणातून १० ते २७ दरवाज्यातून ७५ हजार ४५६ क्युसेक आणि १ ते ९ दरवाजे हे आपत्कालीन असून ते दोन फूट उंचीपर्यंत उचलण्यात आलेले आहेत. त्यामधून १८ हजार ८६४ पाण्याचा विसर्ग सुरु आहे. असा एकूण ९४ हजार ३२० क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षातील हा सर्वात मोठा विसर्ग मानला जातोय. आज सोडण्यात आलेल्या या मोठ्या विसर्गामुळं गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीवर असलेले अनेक छोटे-मोठे पूल देखील पाण्याखाली गेलेत. यामुळं नदीकाठच्या सर्व गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनानं नदी काठच्या नागरिकांना प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरामुळं औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा