नवी दिल्ली १८ फेब्रुवारी २०२५ : भारतीय निवडणूक आयोगाच्या इतिहासात आज एक महत्त्वाचा क्षण आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. १९ फेब्रुवारी रोजी ते आपला पदभार स्वीकारतील आणि देशाच्या निवडणूक प्रक्रियेला नवी दिशा देतील.
निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी
ज्ञानेश कुमार यांच्या खांद्यावर आता देशातील निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. बिहार, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. २०२९ पर्यंत देशभरातील निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत.
प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ अनुभव
१९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांचा जन्म २७ जानेवारी १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. वाराणसी आणि लखनऊमधील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. केरळ केडरचे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत.
देशाच्या विकासात मोलाचे योगदान
ज्ञानेश कुमार यांनी गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करताना कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या मसुद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच, अयोध्या राम मंदिर निर्माण समितीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी भूमिका बजावली. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या निवडीतही त्यांचा सहभाग होता.
लोकशाहीसाठी सज्ज
निवडणूक आयुक्त म्हणून काम केल्यानंतर, आता मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार देशातील लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या अनुभवाने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल, यात शंका नाही. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे