धाराशिव, ९ नोव्हेंबर २०२३ : धाराशिव जिल्हयातील तेरखेड्यात फटाक्यांच मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. फटाक्यांची उत्तर काशी म्हणुन तेरखेड्याची ओळख आहे. येथील फटाके मोठा आवाज देतात म्हणुन राज्यातील ग्राहक, दुकानदार मोठया प्रमाणात तेरखेडा येथे फटाका खरेदीसाठी येतात. दिवाळीत तब्बल ५० कोटीची उलाढाल या गावात होते. तर वर्षभरात १०० कोटीची उलाढाल या व्यवसायातुन होत असते.
परंतु प्रत्यक्षात येथील परिस्थिती फार वेगळी आहे. या ठिकाणी फटाका उत्पादनासाठी महसुल प्रशासनाने ४२ कारखानदारांना परवाना दिलाय, मात्र १०० पेक्षा अधिक कारखानदार फटाका उत्पादन घेतात. तसेच शासनाने फटाक्याला ७५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठेवली आहे. पण तेरखेडा येथील फटाका मात्र १५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज करतात. याबाबत प्रदुषण विभागाने, आवाज मोजणीचे यंत्र आमच्याकडे नाही आम्ही फक्त हवेचे प्रदुषण पाहतो असे वरवरचे उत्तर दिले आहे. तेरखेडा येथील फटाक्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण त्वरित थांबवावे तसेच अवैध कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धाराशिव जिल्हयातील तेरखेडा, गोजवडा, चोराखळी, इंदापुर, पिंपळगाव, गोपाळवाडी, कसबे-तडवळे, माणकेश्वर, बावी या गावा मध्ये फटाका बनवण्याचे कारखाने आहेत. येथील फटाका विशेषतः सुतळी बाँम्बची राज्यात तसेच परराज्यात विक्री होते. इथे बनणाऱ्या सुतळी बाँम्बचा आवाज इतका मोठा असतो कि, कान सुन्न होऊन काही क्षणासाठी माणुस बधीर होतो. हा आवाज मोजण्याचे यंत्र महसुल प्रशासन, प्रदुशण महामंडळ, औद्योगिक महामंडळ(सुरक्षा) या विभागांकडे उपलब्ध नाही. १५० डेसीबल पेक्षा जास्त आवाजहोत असताना या आवाजाची मोजणी करण्याचे काम महसुल प्रशासनाचे नाही, यासाठी वेगळी यंत्रणा आहे, असे महसुल खात सांगतय. तर फटाका उत्पादन करणाऱ्या कारखानदाराना महसुल विभाग परवाना देतो. आमच्याकडे अर्ज आला तर आम्ही फक्त नाहरकत देतो. बाकीच आम्ही पाहत नाही अस पोलीस सांगतात.
तेरखेडा परिसरात फटाका कारखान्यात या पुर्वी अनेकदा दुर्घटना झालेल्या आहेत. संबधित कारखानदाराकडे आगीवर नियंत्रित करण्याची यंत्रणा नसल्यामुळे फायर ब्रिगेडची वाहने बोलावुन आग विझवावी लागते. तेरखेडा येथील सुतळी बाँम्बचा आवाज हा शासनाने निर्धारित केलेल्या आवाजा पेक्षा जास्त असल्यामुळे लहान मुले तसेच वयोवृध्द, हृदय रोगी यांना जास्त त्रास होत आहे. या सुतळी बाँम्ब बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख