जळगाव, ९ एप्रिल २०२४ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांना पिंपरी-चिंचवड, पुणे येथील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
डॉ. देवरे हे मूळचे जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी खडकदेवळा ते गोंदेगाव अशी रोज पायपीट करीत आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी रोजंदारीवर काम करून पूर्ण केले. पुढे त्यांनी एम. ए.; एम. बी. ए.; एम. एल. एल. अँड एल. डब्ल्यू. आणि पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. सध्या ते पोस्ट डॉक्टरेटसाठी प्रयत्नशील आहेत.
शिक्षण घेत सुरुवातीला कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी १२ वर्षे काम केले. याबरोबरच त्यांनी स्पर्धा परीक्षांकडेही स्वतःला वाहून घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०१६ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागात प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सहाय्यक सचिव (राजपत्रित, वर्ग २) या पदावर निवड झाली. त्यानंतर विश्वकोशातील त्यांच्या विविध नाविन्यपूर्ण कामाची दखल घेऊन शासनाने विश्वकोश मंडळाच्या सचिवपदावर (राजपत्रित, वर्ग १) त्यांची नियुक्ती केली. तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदाचा कार्यभारही त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
विश्वकोशाच्या प्रस्तावित उपक्रमांना गती देत मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण, कुमार विश्वकोश, ऑलिम्पिक कोश तसेच ज्ञानमंडळांच्या नोंदींना चालना देणे आदी कामे ते सध्या प्राधान्याने हाताळत आहेत. विश्वकोश मंडळाचे उपकार्यालय वाई (सातारा) येथील कार्यालयात डॉ. देवरे रुजू झाल्यापासून त्यांनी मराठी विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथाचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्याचे आणि वाचकांची जिज्ञासा जागृत ठेवण्याचे काम हाती घेत महाराष्ट्रभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी मराठी भाषेचा राज्यभर आणि राज्याबाहेरही प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भाषिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत शासनाच्या मराठी भाषा विभागाकडील पुस्तकांचं गाव या अभिनव योजनेच्या विस्तारासाठी कार्यरत आहेत. शिवाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या शासनाच्या अभिजात भाषा समितीचे सदस्य सचिव म्हणूनही डॉ. देवरे जबाबदारी पाहत आहेत. शासनाच्या मराठी भाषा विभागाकडील विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या दोन संस्थांची धुरा डॉ. देवरे यांच्यावर आहे, ही खान्देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेऊन खान्देश मंडळाने खान्देश भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : आत्माराम गायकवाड