Draft PMC ward plan puts Ajit Pawar’s NCP faction in a spot?
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं रणंगण आता अधिकच तापू लागलं आहे! नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे शहरात नवे राजकीय समीकरणांचे वादळ उसळले आहे. या रचनेवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडत असून, भाजपच्या राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहेत. विशेषतः अजित पवार यांच्या गटाची कोंडी झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. राष्ट्रवादीने थेट भाजपवर ‘प्रभाग रचनेचा फायदा मिळवण्यासाठी सत्ता वापरत आहे’ असा आरोप केला आहे.
यातच आता एकनाथ शिंदे गटही शर्यतीत उतरल्याचे दिसतेय! शिवसेनेचा शिंदे गट नगर विकास विभागाच्या माध्यमातून रचना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जोरदार कुजबुज आहे. यामुळे संपूर्ण प्रभाग रचना भाजप-शिंदे गटाच्या अनुकूलतेनुसार आखली जात असल्याचा आक्रोश राष्ट्रवादीने केला आहे. पारदर्शक निवडणुकीची मागणी करणारे पक्ष आता राजकीय फायद्यांसाठी आराखड्याचे राजकारण करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पुणेकरांच्या भवितव्याशी खेळ होतोय का, हा मोठा प्रश्न उभा राहतोय!
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेत झालेल्या फेरबदलांचा अनुभव पाहता, शिंदे गटाला असं वाटतं की, तशाच प्रकारे पुण्यातही प्रभाग सीमारेषांमध्ये ‘सामरिक बदल’ करून राजकीय फायदा मिळवता येईल. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी प्रभाव टाकण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर अनेक तज्ञांचा अंदाज आहे की, पुढील टप्प्यात प्रभाग रचनेभोवती सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप, विरोधकांचा आक्रोश आणि जनतेतील संभ्रम यांची त्रिसंधी निर्माण होणार आहे. या सगळ्या घडामोडी पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकीचं राजकारण आणखी धगधगते करत आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक कोंडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची झाली आहे. उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व असून, हे वर्चस्व कमी करण्यासाठी नुकत्याच समाविष्ट झालेल्या गावांचे प्रभाग मोठे केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रभाग रचनेबाबत तक्रारी केल्याचे समजते.
दुसरीकडे, भाजपवर विश्वासात न घेता परस्पर प्रभाग रचना केल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीची प्रभाग रचना करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच आता इतर पक्षही या प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. येत्या काही दिवसांत हा आराखडा प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर हे राजकीय नाट्य अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. या प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा काय असेल आणि त्यामुळे कोणत्या पक्षाला फायदा व कोणाला तोटा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































