नांदगाव, नाशिक १९ डिसेंबर २०२३ : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषण परीस्थिती आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप पिके हातची गेली, तर रब्बी पिकांची दूरदूर शक्यता नाही. मालेगाव, नांदगाव, देवळा तालुक्यातील असंख्य शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी ते आता मजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यात जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांची स्वत:ची शेती असूनही पाण्याअभावी काहीच न पिकल्याने त्यांच्यावरही मजुरीसाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली असून रोज सकाळी मजुरांची शेकडो वाहने कळवणच्या दिशेने जाताना दिसतात. रोज अनेक वाहनातून जीवघेणा प्रवास करत माणसांचे लोंढेच्या स्थलांतर करत आहेत. मायबाप सरकारने दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला गावातल्या गावातच काम उपलब्ध करून देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाने अवकृपा केली.खरिपाची पिके पावसाअभावी डोळ्यादेखत करपली तर विहिरींनीही तळ गाठल्याने कांद्याची लागवड रखडली तर रब्बीच्या आशा धूसर झाल्या.शेतमजूर व शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही.पोटाची खळगी कशी भरायची, मुला बाळांचे पालनपोषण, शिक्षण कसे करायचे एव्हढेच नाही तर घरगाडा कसा हाकायचा याची चिंता सतावत आहे. खास करून मालेगाव, नांदगाव व देवळा तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. निसर्गाच्या लहरीपणाच्या अस्मानी सुलतानी संकटात होरपळणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले तर शासन आणि प्रशासकीय पातळीवर दुष्काळ निवारणीसाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नसल्याने शेतमजूर व शेतकऱ्यांचे लोंढे वाहने भरून स्थलांतर असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे