पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट

फलटण, सातारा १९ डिसेंबर २०२३ : काल दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. भेटी दरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे आणि खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु आता समाजातील मुला मुलींची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकुन तसेच बँक आणि खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. तर शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही, त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जाती मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे, परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रत धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. तरी याबाबत आपण लक्ष घालावे आणि समाजाला आरक्षण दयावे हि विनंती दोन्ही खासदारांनी केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर सकारात्मक विचार केला जाईल तसेच लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांना दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा