प्रत्येक चौथा आमदार सवर्ण… जाणून घ्या बिहार निवडणुकीतील जातीय समीकरण

2

पाटणा, १३ नोव्हेंबर २०२०: बिहारच्या राजकारणातील भाजप-जेडीयू युतीचा फॉर्म्युला कदाचित यावेळी नितीशकुमारांसाठी नसला तरी सवर्ण समाजासाठी सुपरहिट ठरलाय. निवडणुकीच्या निकालासह एनडीएची सत्ता येण्याबरोबरच सवर्ण वरून आलेल्या आमदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचवेळी, बिहार-जेडीयू समीकरण हे बिहारमधील यादव, कुर्मी आणि कुशवाह या जातींसाठी गैरसोय असल्याचं सिद्ध झालं आहे. हेच कारण आहे की या ओबीसी समाजातून येणार्‍या जातींचे आमदार कमी झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत एनडीएनं भाजप, जेडीयू, व्हीआयपी आणि एचएएम यांच्यासह मिळून उच्च आणि मागासवर्गीय जातींचा समतोल निर्माण केला. एनडीएचं हे सूत्र भाजपाची कोर व्होट बँक मानल्या जाणार्‍या उच्चवर्गीय समाजासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरलं आहे. यावेळी बिहार विधानसभेच्या प्रत्येक चार पैकी एक आमदार सवर्ण आहे. राज्यात २४३ विधानसभा जागांपैकी जवळपास ६४ आमदार उच्च जातींमधून निवडून आले आहेत.

२८ राजपूत आमदार

यंदा एकूण २८ राजपूत आमदार बिहारमधून आले आहेत, तर यापूर्वी २०१५ मध्ये २० आमदार विजयी झाले होते. अशा प्रकारे राजपूत आमदारांची संख्या ८ नं वाढली आहे. यावेळी भाजपनं २१ राजपूतांना तिकिटं दिली, त्यापैकी १५ विजयी झाले. जेडीयूचे ७ पैकी केवळ २ उमेदवार विजयी होऊ शकले आणि दोन उमेदवार व्हीआयपी तिकिटावर विजयी झाले. अशा प्रकारे एनडीएच्या २९ तिकिटांपैकी १९ राजपूत विधानसभेवर पोहोचले आहेत.

त्याच वेळी, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुतीनं १८ राजपूतांना तिकीटं दिली, त्यापैकी केवळ ८ विजयी होऊ शकले. या वेळी आरजेडीनं ८ तिकिटं दिली होती, त्यापैकी ७ विजयी झाले आहेत, तर काँग्रेस मधील १० पैकी एकाला विजय मिळाला आहे. याशिवाय एक अपक्ष राजपूत उमेदवार देखील निवडून आला आहे. मागील निवडणुकीत भाजपाकडून ९, आरजेडीचे २, जेडीयूचे ६ आणि काँग्रेसचे तीन राजपूत आमदार निवडून आले होते. सध्या परिस्थिती पाहता भाजप आणि आरजेडी यांच्या उमेदवारांमध्ये वाढ दिसून आली आहे, तर काँग्रेस आणि जेडीयू यांच्या जागा कमी होताना दिसत आहे.

भूमिहार जातीच्या आमदारांमध्ये वाढ

यावेळी बिहार निवडणुकीत भूमीहारचे (बिहार मधील एक उच्च जात ज्यांना ब्राह्मण म्हणून देखील संबोधलं जातं) २१ आमदार वेगवेगळ्या पक्षांमधून निवडून आले आहेत तर २०१५ च्या निवडणुकीत १७ आमदार निवडून आले होते. यावेळी बहुतेकांनी भाजपकडून विजय मिळविला आहे. भाजपच्या १४ भूमिहार उमेदवारांपैकी ८ तर जेडीयूच्या ८ उमेदवारांपैकी ५ भूमीहार उमेदवार विजयी झाले आहेत आणि एचएएम कडून एक उमेदवार विजयी झाला आहे. अशाप्रकारे एनडीएमधून १४ भूमिहार आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर महायुतीच्या तिकिटावर भूमिहारचे ६ आमदार निवडून आले आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजेच ११ उमेदवारांपैकी चार उमेदवार निवडून आले आहेत, तर आरजेडी आणि सीपीआय चे १-१ आमदार विजयी झाले आहेत. तथापि, २०१५ मध्ये भाजपाकडून ९, जेडीयूचे ४ आणि कॉंग्रेसचे ३ भूमिहार आमदार निवडून आले होते.

ब्राह्मण आमदारांमध्ये वाढ

यावेळी बिहारमध्ये १२ ब्राम्हण आमदारांनी निवडणुका जिंकल्या आहेत, तर २०१५ मध्ये ११ आमदार विजयी झाले होते. भाजपच्या १२ ब्राम्हण उमेदवारांपैकी ५ विजयी झाले आहेत तर जेडीयूच्या दोन ब्राह्मण उमेदवारांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या ९ पैकी ३ ब्राह्मण विजयी झाले आहेत, तर आरजेडीच्या ४ पैकी २ विजयी झाले आहेत. २०१५ च्या निवडणुकीत ११ ब्राह्मण विजयी झाले, त्यापैकी ३ भाजपाचे, १ आरजेडी, २ जेडीयू आणि ४ काँग्रेसचे होते. त्याचवेळी कायस्थ समाजातील तीन आमदार विजयी झाले आहेत, ते सर्व भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. २०१५ मध्ये दोन कायस्थ भाजप व एक काँग्रेसमधून निवडून आले होते.

यादव आमदारांच्या संख्येत घट

यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत यादव आमदारांची संख्या पुन्हा २०१० च्या आकडेवारीवर आली आहे. यावेळी एकूण ५२ यादव विविध पक्षातून निवडून आले आहेत तर २०१५ मध्ये ६१ आमदार विजयी झाले होते. आरजेडीच्या तिकिटावर ३६ आमदार, सीपीआयचे (मार्क्स लेनिन) २ आमदार, काँग्रेसचे एक आणि सीपीएम मधून एक यादव आमदार निवडून आले आहेत. अशाप्रकारे महायुतीतून ४० यादव आमदार विजयी झाले आहेत. त्याचवेळी एनडीएचे १२ यादव विधानसभेत पोहोचले आहेत, ज्यात भाजपचे ६, जेडीयूचे ५ आणि व्हीआयपीचे एक यादव आमदार यांचा समावेश आहे. मात्र, २०१५ मध्ये ४२ जागा आरजेडीनं जिंकल्या, जेडीयूच्या ११, भाजपाकडून ६ आणि काँग्रेस मधून दोन यादव आमदार विजयी झाले होते.

कुर्मी-कुशवाह आमदारांची संख्या घटली

बिहार निवडणुकीत केवळ यादवच नव्हे तर कुर्मी आणि कुशवाह आमदारांची संख्याही कमी झाली आहे. यावेळी केवळ ९ कुर्मी समुदायातील आमदार विजयी होऊ शकले, तर २०१५ मध्ये १६ कुर्मी समुदायातील आमदार विजयी झाले होते. यावेळी जेडीयूच्या १२ कुर्मी उमेदवारांपैकी केवळ ७ उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपच्या तिकिटावर कुर्मी समुदायातील केवळ दोन आमदार निवडून आले आहेत. आरजेडी आणि काँग्रेसमधून एकही कुर्मी समुदायातील उमेदवार निवडणूक जिंकू शकला नाही. २०१५ मध्ये जेडीयूचे १३ कुर्मी समुदायातील आमदार तर भाजप आणि काँग्रेस मधून प्रत्येकी एक आमदार विजयी झाले होते.

त्याच बरोबर कुर्मी समाजाप्रमाणं कोइरी (कुशवाह) आमदारांची संख्याही कमी झाली आहे. यावेळी बिहार निवडणुकीत कुशवाह समाजाचे १६ आमदार विजयी होऊ शकले आहेत, तर २०१५ च्या निवडणुकीत २० आमदार विजयी झाले होते. यंदा भाजपाचे ३, जेडीयूचे ४, आरजेडीचे ४ आणि सीपीआय (मार्क्स लेनिन) ४ कुशवाह समाजाचे आमदार निवडून आले आहेत तर एकानं सीपीआयच्या तिकिटावर विजय मिळविला आहे. त्याचबरोबर २०१५ च्या निवडणुकांकडे नजर टाकली तर ४ भाजपा, ४ आरजेडी, ११ जेडीयू, १ काँग्रेस आणि १ आरएलएसपीच्या तिकिटांवर विजय झाला होता. तथापि, विशेष म्हणजे उपेंद्र कुशवाह यांनी ४८ कुशवाह समाजातील उमेदवारांना तिकीटं दिली, त्यापैकी एकही उमेदवार जिंकू शकला नाही.

वैश्य-दलित-एस.टी. उमेदवार

यावेळी बिहार निवडणुकीत वैश्य समुदायाचे २४ आमदार वेगवेगळ्या पक्षांमधून निवडून आले आहेत तर २०१५ मध्ये विधानसभेत त्यांची संख्या १६ होती. अशा प्रकारे चार आमदार वाढले आहेत. वैश्य समाजातील सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत ते बीजेपी मधून ज्यांची संख्या १५ आहे. त्याचवेळी आरजेडीचे ५, सीपीआय (मार्क्स लेनिन) चे २, जेडीयू व काँग्रेसचे १-१ आमदार वैश्य समाजातून विजयी झाले. याशिवाय ३८ सुरक्षित जागांमधून दलित आमदार विजयी झाले आहेत तर २ अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा त्यांच्या खात्यात गेल्या आहेत. एसटी समाजाच्या दोन्ही जागा भाजपानं जिंकल्या आहेत.

मुस्लिम आमदारांची संख्या कमी झाली

बिहारमधील मुस्लिम आमदारांची संख्या कमी होऊन ती दहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर गेली आहे. यावेळी निवडणुकीत १९ मुस्लिम आमदारांचा विजय झाला आहे तर २०१५ मध्ये २४ मुस्लिम आमदार निवडून आले होते. आरजेडीच्या तिकिटावर सर्वाधिक मुस्लिम आमदार निवडून आले आहेत ज्यांची संख्या ८ आहे तर याच्या खालोखाल सर्वाधिक मुस्लिम आमदार इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मधून निवडून आले आहेत त्यांची संख्या ५ आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसचे ४, सीबीआय (मार्क्स लेनिन) एक आणि बसपाचे एक उमेदवार विजयी झाले आहेत, तर जेडीयू मधील एकही मुस्लिम जिंकू शकला नाही. त्याच वेळी २०१५ च्या निवडणुकीत ११ मुस्लिम उमेदवार आरजेडी, काँग्रेसचे ७, जेडीयूचे ५ आणि सीपीआय (मार्क्स लेनिन)चे एक आमदार निवडून आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा