युरोपिय देशांच्या उदाहरणावरून भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२० : सध्या राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असली तरी युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपिय देशांच्या उदाहरणावरून भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे.५ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली होती. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातही खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर आरोग्य सेवा संचालनालयानं जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला सूचना देऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली तरी चाचण्या सक्षमपणे सुरू ठेवाव्यात अधिक प्रमाणात फ्लू सदृश्य आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचं प्रमाण वाढवावं, घरोघरी जाऊन नियमित सर्वेक्षण करावं असं आरोग्य संचालनालयानं सांगितलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजेच ज्यांच्यामार्फत कोरोना त्वरित पसरू शकतो, अशा किराणा दुकानदार, भाजीवाले, फेरीवाले, हॉटेल मालक, वेटर, वर्तमानपत्रे, दूध घरपोच करणारी मुलं, मोलकरणी, सिलेंडर पोहोचवणारे कर्मचारी, ट्रक रिक्षा चालक, मजूर, सुरक्षारक्षक यांचं सर्वेक्षण आणि चाचण्या कराव्यात.

प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण संख्येच्या प्रमाणानुसार कोरोना उपचाराची जबाबदारी संबंधित जिल्हा किंवा शहारांमधील रुग्णालयांवर सोपवावी, गरजेनुसार तातडीच्या वेळी अधिकच्या खाटा उपलब्ध करण्याची योजना तयार असावी, जिल्हा आणि महापालिका स्तरावरील टास्क फोर्सने स्थानिक परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा, रुग्ण संख्येनुसार ५ ते ७ रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि प्रत्येक शहरी प्रभाग/तालुका विभागातील एक रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित ठेवावं असंही सांगण्यात आलं आहे. औषधे, साधनसामग्री आणि ऑक्सिजनचा पुरवठा हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवावा. रुग्णवाहिका सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या असाव्यात याची काळजी घ्यावी. याची माहिती सर्वसामान्य जनतेला विविध माध्यमातून द्यावी असे निर्देश आरोग्य संचालनालयानं दिले.

६० वर्षांवरील आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अनलॉकनंतरही आपला जनसंपर्क मर्यादित ठेवावा. त्यांच्यासाठी कोमॉर्बिडिटी क्लिनिक सुरू करावे. तसेच त्यांची साप्ताहिक तपासणी करावी असा सल्ला ही देण्यात आला असून कोविड नियंत्रणासाठी स्थानिक स्तरावर उपकेंद्र, वॉर्डनिहाय पथके कार्यरत असणे गरजेचं आहे. या पथकांनी होम क्वॉरन्टाईन असलेल्या रुग्णांची नियमित देखरेख करावी असं प्रशासनाला सांगण्यात आलं आहे.

यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी होणे गरजेचं आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांना श्वसनाचा त्रास आणखी वाढू शकतो असा इशाराही आरोग्य विभागानं दिला आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा