Agricultural department crackdown on fake seeds Chopada: चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे १८ लाख रुपये किंमतीचे बनावट (HTBT) कापूस बियाणे जप्त केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात नितीन नंदलाल चौधरी यांच्या अक्कुल-खेडा रोडवरील शेडवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२७३ पाकिटे व प्रतिबंधित बियाणांचा साठा सापडला.
ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, तसेच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीवर बियाणे कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई तालुक्यात बनावट बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरत असून, कृषी विभागाची तत्परता आणि दक्षता यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे.याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी,आत्माराम पाटील















































