लॉकडाऊन मधला ‘फॅमिली डे’

१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशनने कुटुंब दिन साजरा करण्याची परंपरा १९९३ पासून सुरू केली कुटुंबाचे काय महत्व असते हे पटवून देणारा हा दिवस आहे. भारताबाहेर बघितले तर एकत्र कुटुंब पद्धती फारशी बघण्यास मिळत नाही. परंतु भारतीय संस्कृती मध्ये कुटुंबाला एक विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’  असे शिकवते.

पाश्चिमात्य संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर होणारा प्रभाव पाहता आपण कुटुंब ही संकल्पना देखील विसरत चाललो आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये सोशल मीडिया हेच कुटुंब झाले आहे. धावपळीच्या जीवनात एकमेकांना वेळ देणे देखील अशक्य होते. त्यामुळे कोणाचा कोणाशी ताळमेळ नव्हता. एकाच घरात राहून सगळे अनओळखी असल्यासारखे होते. अशा वेळेस चर्चा ही असायची की, कुटुंबासाठी वेळच मिळत नाही. वेळ देत नाही म्हणून त्यावरून वाद देखील होत होते.

पण आता चित्र वेगळे दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता सगळीकडे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी हे धावपळीचे जीवन थांबले आहे. कुटुंबासाठी आता वेळच वेळ आहे. जवळपास दोन महिने लोक आपापल्या घरात आहेत. परंतु आता सगळेच घरात का आहेत यावरून देखील वाद सुरू झाले आहेत. एकेकाळी वेळ मिळत नाही म्हणून भांडणारे आज एकत्र असताना देखील भांडत आहे. थोडक्यात काय तर या धावपळीच्या जीवनाचा माणूस गुलाम झाला आहे. ८ तास १२ तास काम करणे हे त्याच्या अंगवळणी पडले आहे. आधुनिक कुटुंबात आता पैसा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे आणि सध्या त्याचीच कमतरता सगळ्यांची मानसिकता बदलत आहे.

पूर्वी घरातली मोठी व्यक्ती घरासाठी महत्त्वपूर्ण असायची पण आता पैशानी त्याची जागा घेतली आहे. ही झाली नाण्याची एक बाजू पण याची दुसरी बाजू आपण लक्षात घेतली का? ही दुसरी बाजू म्हणजे लॉकडाउन मध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय समाज आज आपल्या घरात कोंडला गेला आहे. या कोंडीचा त्याला त्रास होत आहे आणि एकत्र असून देखील वाद घालण्यास प्रवृत्त होत आहे. पण हजारो किलोमीटर लांब अडकून पडलेले हे स्थलांतरित मजूर आपल्या घरी जाण्यासाठी तळमळत आहेत. पैशाचा अभाव त्यांना घरी जाण्यास प्रवृत्त करत आहे. आज कुटुंब दिनाच्या दिवशी लाखो कुटुंबे विस्कळीत झालेली आहेत. हजारो किलोमीटर लांब हे कुटुंबे विभागले गेले आहेत. कुटुंबासाठी होणारी त्यांची फरफट पूर्ण देश बघत आहे.

सध्या पैशाचा अभाव ठराविक वर्गातील कुटुंबांमध्ये वादाचे कारण ठरत आहे तर दुसरीकडे पैशाचा अभाव हाच कुटुंबाकडे ओढ वाढवत आहे. आजच्या कुटुंब दिनामध्ये दोन बाजू समोर येतात एक म्हणजे संपूर्ण ‘इंडिया’ साजरा करत असलेला ‘फॅमिली डे’ आणि दुसरी बाजू म्हणजे उरलेला ‘भारत’ कुटुंब दिनाच्या दिवशी कुटुंबाला भेटण्यासाठी तळमळत आहे. वेळप्रसंगी जीव देखील गमावत आहे…

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा