कोल्हापूर, २६ ऑगस्ट २०२३ : कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना उद्देशून विधान केले आहे तसेच भाजपवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर कुणी केला, तरुणांना कुणी बिघडवल? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत.
ज्याची भूमिका सत्याची आहे ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. पक्षातील अनेकांना ‘ईडी’ची नोटीस दिली होती. हे लोक ‘ईडी’ला का घाबरले, हा खरा प्रश्न असून, कारवाई होणार म्हटल्यावर यातील अनेकांनी आपली भूमिका बदलली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना उद्देशून येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा शुक्रवारी येथील दसरा मैदानात झाली. यावेळी पक्ष फुटीवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांविषयी प्रथमच संशय व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे.
पवार म्हणाले, की ज्यांनी काही गैरप्रकार केलेले नाहीत ते अशा चौकशीला घाबरत नसतात. मलाही ‘ईडी’ची नोटीस आली होती. त्यात उद्या या म्हटले असताना मी आताच येतो म्हणून निघालो. मात्र, पोलिसांनी घरी येऊन हात जोडून तुम्ही येऊ नका, म्हणून विनंती केली. आरोप ठेवलेल्या बँकेतून मी कधी कर्ज घेतले नव्हते. केवळ भीती घालण्याचा प्रयत्न केला होता. ज्याची भूमिका सत्याची आहे ते घाबरत नाहीत. पक्षातून बाहेर पडलेल्या या बहुतेक नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आलेली आहे. या लोकांनी काही केलेले नाहीतर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते. परंतु आपल्यावर कारवाई होणार म्हटल्यावर यातील अनेकांनी आपली भूमिका लगोलग बदलली, असा टोला पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात बंड झाल्यानंतर शरद पवार यांची ही कोल्हापुरातील पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांना फटकारताना भाजपवरही तोफ डागली. पवार यांनी म्हटले की, अनिल देशमुख स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांनी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली. पण केवळ त्रास देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकले असल्याचे पवार यांनी म्हटले. सामनाचे संपादक संजय राऊत हे भाजपवर टीका करत असतात. त्यांनाही लिखाण बंद करण्याची धमकी दिली. त्यांनी जुमानल नाही तर त्यांनाही तुरुंगात टाकलं. नवाब मलिक यांना देखील तुरुंगात टाकलं.
अजित पवार गटात असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना पवार यांनी म्हटले की, कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे. काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीला सामोरे जातील. घरातील भगिनींनी सांगितले की आम्हाला गोळ्या घाल्या. पण त्या कुटुंबातील प्रामुख्याने तसं म्हटलेलं ऐकलं नाही. जी भूमिका त्या घरातील भगिनीने घेतली ती त्या प्रमुख नेत्याने घेतली नाही. भाजपसोबत सत्तेत बसले असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे










































