पिंपरी-चिंचवडमध्ये बुद्धिमत्तेचा कस! ‘फिशर रँडम चेस ९६०’ आणि पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात

Fisher Random Chess 960 & Traditional Chess Tournament in Pimpri-Chinchwad from July 19

Fisher Random Chess 960 & Traditional Chess Tournament: बुद्धिबळप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी! पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १९ जुलै) भोसरीतील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेची मान्यता लाभलेली ही स्पर्धा, पिंपरी-चिंचवड संघटना तांत्रिकदृष्ट्या नियोजित करणार आहे.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे खुल्या गटात ‘फिशर रँडम चेस ९६०’ (Fisher Random Chess 960) या प्रकारात होणारी स्पर्धा. पिंपरी-चिंचवडमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जात आहे. सध्या जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) हा या प्रकाराचा मोठा पुरस्कर्ता आहे.

‘फिशर रँडम’मध्ये खेळाडूंच्या पटावरील पहिल्या रांगेतील मोहऱ्यांची विशिष्ट नियमांना धरून अदलाबदल केली जाते. यामुळे खेळाडूंना पारंपरिक बुद्धिबळातील सुरुवातीच्या चालींचा केलेला अभ्यास बाजूला ठेवून, डावाच्या पहिल्या चालीपासूनच मोहऱ्यांच्या स्थितीचा सखोल अभ्यास, ज्ञानाची खोली, कल्पकता आणि बुद्धिसामर्थ्य यांचा कस लागतो. यामुळे खेळाचा थरार आणि अनिश्चितता वाढते.

खुला गट वगळता, ७, ९, ११, १३ व १५ वर्षांखालील गटांतील स्पर्धा मात्र पारंपरिक पद्धतीनेच होणार आहेत. सर्व गटांमध्ये स्विस लीग पद्धतीच्या एकूण सात फेऱ्या खेळल्या जातील. या स्पर्धेत विजेत्यांना रोख बक्षिसे, ४३ सन्मानचिन्हे आणि ९९ पदके प्रदान केली जाणार आहेत.

बुद्धिबळाच्या या अनोख्या आणि आव्हानात्मक प्रकाराचा अनुभव घेण्यासाठी तसेच पारंपरिक बुद्धिबळातील कौशल्ये आजमावण्यासाठी सर्व इच्छुक खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशनचे अध्यक्ष विवेक भागवत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे