नाशिक, २४ जुलै २०२३ : वनविभागाच्या राखीव जमिनीवरील अनधिकृत झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकासह वनमजुराला, आठ ते दहा जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात आज सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वनरक्षक वत्सला तुकाराम कांगणे व वनमजुर मधुकर शिंदे अशी मारहाण झालेल्या वन कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात काही आदिवासींनी वनविभागाच्या राखीव जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी वनरक्षक कांगणे व वनमजुर शिंदे मेंढी शिवारात गेले होते.
झोपड्या तोडण्यासाठी कांगणे यांनी कोयता हातात घेतला होता. आदिवासी लोक येण्यापूर्वी दोन झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र आदिवासींना हे कळल्यानंतर त्यांनी या ठिकाणी धाव घेऊन वनविभागाला अतिक्रमण काढण्यास विरोध केला. यानंतर आठ ते दहा जणांनी कांगणे व शिंदे यांना दमदाटी व शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर