पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर, पुण्यातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी

पुणे, ९ नोव्हेंबर २०२०: राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी राज्यातील तीन पदवीधर व एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपानं चार जणांची नावं जाहीर केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपनं तिकीट दिलं आहे.

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे. १३ नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागं घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.

पुणे:

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. पुण्यात संग्राम देशमुख (भाजप) vs महाविकास आघाडी vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचुकले असा सामना रंगणार आहे.

पुणे पदवीधरसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनाही पुण्यातून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. याशिवाय अभाविपचे राजेश पांडे यांचं नावही पुणे मतदारसंघातून भाजपतर्फे शर्यतीत होतं.

औरंगाबाद:

पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्यानं समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

नागपूर:

नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. नागपुरात अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) असा सामना बघण्यास मिळणार आहे.

अमरावती:

अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा