लोणी काळभोर, दि. १८ जुलै २०२०: कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा १३ जुलैच्या रात्रीपासून कडक लॉकडाऊन केला आहे या वेळी भाजीपाला फळे विक्री सुद्धा बंद केली आहे. त्यामुळे भाजीपाला व फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यामध्ये पेरूला गळती लागली असून औषधचा खर्च सुद्धा निघत नाही म्हणून शेतक-याला गळून पडलेला पेरू बाहेर फेकून द्यावे लागत असल्याची व्यथा हवेलीतील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने पुन्हा दहा दिवसासाठी १४ ते ३० जुलै पासून कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे दवाखाना, मेडिकल, व दुग्धव्यवसाय, वगळून बाकी सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. फळे भाजीपाला मार्केट बंद ठेवले आहेत व रस्त्यावरील शेतमालाची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये बळीराजा भरडला जात आहे भाजीपाला शेतात सडून जात आहे.
तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या १०० टक्के अनुदानावर हवेली तालुक्यातील फुरसुंगी, वडकी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, वागोली, लोणी काळभोर, उरुळी कांचन, या गावात मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड करण्यात आली आहे. साधारणपणे पेरूचे अंतर मशागत म्हणजे खादणे, माती ओढणे, झाडांना शेणखत घालणे, इत्यादी कामे उरकून जानेवारी महिन्यात पाणी सोडले जाते नंतर प्रत्येक आठवड्यात औषध फवारणी केली जाते वेळोवेळी बागेतील तण काढले जाते या गोष्टी मोठ्या खर्चिक आहेत.
पेरूला फळधारणा माल तोडणीयोग्य होण्यासाठी जून महिना उजाडतो व त्यानंतर अखेरपर्यंत पेरूचे उत्पादन जोरदार सुरू होते. त्याचप्रमाणे आताही उत्पादन सुरू आहे परंतु संपूर्ण लॉकडाऊन मुळे पेरूची फळे पिकल्यामुळे फळांचे मोठे नुकसान होत आहे. तयार झालेली गळ शेतकरी रोज किडीचे प्रमाण वाढू नये यासाठी बागेतून उचलून लांब टाकत आहेत. पेरूचे उत्पादन वर्षातून एकदाच होत असल्याने शेतकरी हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नाही उत्पन्न तर नाहीच परंतु खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
यामुळे पेरू फळ व इतर उत्पादक शेतकरी हातबाल झाला असून त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे तरी केंद्र आणि राज्य शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हवेलीतील शेतकरी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे










































