गोल पोस्ट अर्थ शेतकऱ्यांसाठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढली, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढली, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

नवी दिल्ली १ फेब्रुवारी २०२५ : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत ही मर्यादा तीन लाख रुपये होती. मात्र, आता ती वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटनांकडून किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली जात होती. अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कर्ज फक्त ४% दराने उपलब्ध

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना ९% दराने कर्ज दिले जाते. मात्र, सरकार त्यावर २% अनुदान देते. विशेष म्हणजे, वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ३% सूट मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण पारंपरिक कर्जांच्या तुलनेत हे खूप स्वस्त आहे.

देशभरात ७.७५ कोटी किसान क्रेडिट कार्ड धारक

देशात ७.७५ कोटी किसान क्रेडिट कार्ड खातेधारक असून, मार्च २०२४ पर्यंत एकूण ९.८१ लाख कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. याशिवाय मत्स्यव्यवसायासाठी १.२४ लाख कार्ड्स आणि पशुसंवर्धनासाठी ४४.४० लाख कार्ड्स वितरित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

शेतकऱ्यांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. वाढीव मर्यादेमुळे अधिकाधिक शेतकरी आपल्या शेतीच्या विस्तारासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भांडवल उभारू शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून, त्यामध्ये कृषी क्षेत्राला मोठा प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत होणाऱ्या सुधारणा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version