खुशखबर! 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार

मुंबई, 25 सप्टेंबर 2021: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात 4 तारखेपासून शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या जाणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

पालकांची समंती महत्त्वाची

4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात 81.18 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आला. त्यामुळं कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास 7 जुलैला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्यास सुरू करण्यासही शिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे मान्यता दिली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा