पुणे ८ फेब्रुवारी २०२५ : पुणे शहरात भटक्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना आजारी पडल्यावर रस्त्यावर सोडून देतात, ज्यामुळे भटक्या प्राण्यांची संख्या वाढते आणि ते अधिक धोकादायक बनतात.
या भटक्या कुत्र्यांनी अनेकदा लहान मुलांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. शाळेत जाणारी मुले, खेळणारी लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यासाठी हे प्राणी मोठे धोके निर्माण करत आहेत. बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी एकटे असताना हे प्राणी अचानक लोकांवर हल्ला करतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या समस्येवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. महापालिकेकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. भटक्या प्राण्यांना सुरक्षित निवारा देणे, त्यांचे लसीकरण करणे आणि पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.


पुणे शहरात जर भटक्या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवले नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रशासनाने त्वरित यावर लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी :सोनाली तांबे