कोरोना जेएन-वन व्हेरिएंट विषाणूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आढावा

रत्नागिरी २५ डिसेंबर २०२३ : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, मुख्याधिकारी तुषार बाबर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॕ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईप लाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करावी. लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना करुन पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहितीही यावेळी घेतली. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडसची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. असे आवाहनही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केले. न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा